पिठलं

 पिठलं-


लेखिका- सुप्रिया विखणकर.


      "आई ! आज काय करणार आहेस जेवायला? काहीतरी मस्त कर ना!" मुलाची फर्माईश. पण आज अगदी आतून पिठलं खावं असं वाटत होतं. मी काहीच बोलले नाही. भाकरीच्या पिठात गरम पाणी टाकून झाकून ठेवलं आणि कांदा चिरायला घेतला. 

       उत्तर मिळालं नाही म्हणून मुलगा स्वयंपाक घरात माझ्यामागे येऊन उभा राहिला. "काय करतेस जेवायला?" लाडिक प्रश्न. 

        मी पण एकदम गोड हसले आणि त्याच्याकडे बघून म्हणाले, "माझ्या आवडीचं पिठलं- भाकरी". तसा त्याचा चेहरा एकदम बदलला आणि मला हसू आलं.

        "नाही ना! पिठलं बिठलं नको, भाकरी ठीके, पिठलंss काय?" लगेच दुसरे ऑप्शन्स द्यायला सुरुवात झाली. "दाण्याचा कूट घातलेली भाजी चालेल, शेंगदाण्याची चटणी चालेल, पालेभाजी पण चालेल, पण पिठलंs नको याssर!". 

       मी शांतपणे म्हणाले, "अरे, रोज तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं असतं, आज माझ्या आवडीचं."

       "पण आमच्या आवडीचं तुला पण आवडतं. नको ना पिठलं दुसरं काहीतरी प्लीssज." खूपच आर्जवं केली पण मला आज पिठलंच खावसं वाटत होतं. कित्येक महिने झाले होते.

       त्याची भुणभुण सुरू होती. मी त्याला म्हटलं, "अरे, आज ना मला तुझ्या आज्जीची, म्हणजे माझ्या आईची खूप आठवण येत आहे, ती खास मला आवडतं म्हणून हिरव्या मिरचीचं, लसणाच्या फोडणीचं, भरपूर कोथिंबीर घातलेलं पिवळं पिठलं बनवत असे. तुझ्या मामाला आणि मावशीला ते अजिबात आवडायचं नाही, पण मी शेंडेफळ, म्हणून माझ्यासाठी ती ते आवडीने करायची.

        एक सांगू तुला आता? आजीला जाऊन बारा वर्षे झाली. ती गेली तेव्हा तू फक्त पाच वर्षाचा होतास. ती गेल्यावर माझ्या दोघी मावश्या मामाकडे राहिल्या, आपणही तिथेच होतो. घरी अनेक नातेवाईक होते, तेव्हा एकदा जेवायला दादांनी सांगितलं म्हणून पिवळं पिठलं केलं मी. म्हणाले होते तेव्हा पिठलं करायचं तर लाल मिरची घालते तर लगेच दादा म्हणाले, 'नाही, नाही! हिरव्या मिरचीचंच कर. तुझ्या आईला आवडायचं, कोथिंबीर घालून, तुझ्या आईला आवडायचं!'

        मी स्तब्धच झाले. डोळ्यात टचकन् पाणी आलं आणि जाणवलं आपल्याला आईची साधी आवड कधीच लक्षात आली नाही. तिने तिच्या आवडीनिवडी कधी बोलूनही दाखवल्या नाहीत." मोठा उसासा सोडत डोळ्यातलं पाणी पुसत मी भानावर आले. 

       मुलगा माझ्याकडे केविलवाणे बघत होता. मी हसले आणि म्हणाले, "करू ना रे राजा माझ्या आवडीचं पिवळं पिठलं?"    

       तसं तो हो म्हणाला, काहीही कुरकुर न करता बेडरूममध्ये निघून गेला. अचानक तो समजूतदार झाल्यासारखा वाटला आणि वाटलं, आमच्या आईनेही अशा गोष्टी बोलल्या असत्या तर आज तिच्या आठवणीत भरल्या डोळ्यांनी तिच्या आवडीचे पदार्थ नसते बनवावे लागले. 

        जेवायला बसल्यावर पानं वाढली आणि पिठलं- भाकरीचा पहिला घास तोंडात टाकला, डोळे मिटले. 

       मी पुन्हा भावूक होईन, हे लक्षात येताच माझ्या मुलाने लगेच सगळ्यांना सांगितले, "अरे असे पिठले ना, डोंबिवलीच्या आजी ला खूप आवडायचं आणि मम्मीला ही आवडतं, म्हणून केलंय."

      त्याने हे उघडपणे बोलताच मी पटकन डोळे उघडून हसत त्याच्याकडे पाहिले तेव्हा सगळेजण "हो का? अरे वा!  मस्तच झालंय" असं म्हणत मिटक्या मारत खाऊ लागले.

        जेवण झाल्यावर शतपावली घालणाऱ्या लेकाजवळ गेले आणि त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला 'थँक्यू' म्हणाले. तसा म्हणाला, "थँक्यू कशाला? आठवण काढून डोळ्यातलं पाणी काढण्यापेक्षा त्या आठवणी शेअर करून खुश होत राहायचं, म्हणजे मग मनावर दडपण येत नाही, मन हलकं होतं आणि आठवणी गोड होतात. आज तू, तुझी आई तुमच्या जवळ मनमोकळे बोलली नाही म्हणून कुढत आहेस आणि तू ही तशीच वागत आहेस. त्या प्रसंगातून तरी तू लक्षात घ्यायला पाहिजे, मनात असलेलं आपल्या माणसांजवळ सहज बोलून टाकावं म्हणजे बोलले नाही त्याची हुरहूर आणि बोलायला हवं होतं म्हणून कुढत राहणं दूर होईल आणि मन मोकळे राहील. कसं बोलू? काय बोलू ? काय वाटेल? काही गोष्टींचे आपण उगाच दडपण घेतो, आता ते सोडून दे आणि मोकळी राहा." 

        "हो रे ! मला खरंच हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल. माझी आई म्हणायची पातळ पिठलं कसं ताटभर धावत असतं तसं कधी तरी मनाला पण मोकळे सोडून दिले पाहिजे." 

       जेवणात आवडीच्या पदार्थासाठी किरकिर करणारा माझा मुलगा कधी एवढा विचारी झाला माझं मलाच कळलं नाही, साधं पिठलं काय केलं आणि केवढं मन मोकळं झालं, खूप शांत वाटत होतं.

©सुप्रिया विखणकर.

(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.-मेघःशाम सोनवणे.

 


Post a Comment (0)
Previous Post Next Post